Saturday, February 19, 2011

कल्याण-डोंबिवली शिवजयंती २०११

कल्याण-डोंबिवलीत अवतरला शिवकाळ
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
डोंबिवली - "जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव'च्या जयघोषाने कल्याण-डोंबिवलीचा आसमंत दणाणून गेला होता. या वेळी झालेल्या मिरवणुकीत टाळ-मृदंग, सनई-चौघडे, लेझीम व बॅण्ड पथकांच्या साथीने शनिवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. हातात भाला, तलवारी घेतलेली मावळ्यांच्या वेषातील मुले, घोडेस्वार आणि सजवलेल्या चित्ररथांमुळे कल्याण-डोंबिवलीत शिवकाळ अवतरला होता.

कल्याण जिल्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा शिवजयंती एकत्रित साजरी करण्यात आली. शिवरायांचा पुतळा ठेवलेल्या रथाची मिरवणूक महात्मा फुले चौक, नेहरू चौक, महादेव चौक, बाजारपेठ मार्गे गांधी चौक, लक्ष्मीनारायण चौक, पारनाका, लोकमान्य टिळक चौक, अहिल्याबाई चौक, सहजानंद चौक मार्गे लाल चौकीहून दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी या मिरवणुकीचा सांगता सोहळा झाला. या किल्ल्यावर दुर्गा देवीची पूजा व आरती करण्यात आली. या मिरवणुकीत सावरकर क्रीडा मंडळ यांचे मल्लखांब प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तसेच या वेळी जिल्हा कॉंग्रेसचे जयनारायण पंडित व उत्सव समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल गवळी उपस्थित होते.

समाजात एकोपा वाढविण्यासाठी हा उत्सव एकत्र साजरा करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल गवळी यांनी "सकाळ'ला सांगितले.

या वेळी सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कल्याण पूर्वेत शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. दिवंगत दादासाहेब गायकवाड क्रीडांगणातून या मिरवणूक सोहळ्याची सुरुवात झाली. पूर्वेतील प्रत्येक प्रभागातील नागरिक यात सहभागी झाले आहेत. प्रत्येकाने पारंपरिक वेष परिधान केला होता. तसेच चित्ररथात शिवाजी महाराजांचा प्रतीकात्मक पुतळा उभारून त्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या बाजूला बाल मावळे, जिजाबाई, त्यांचे मावळे अशा वेशभूषा लहान मुलांनी केलेल्या होत्या. या मिरवणुकीला कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड व विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी भेट दिली. या क्रीडांगणातून मिरवणुकीची सुरुवात होऊन ती तिसगाव, काटेमाविली या मार्गे फिरून पुन्हा क्रीडांगणात या मिरवणुकीचा सांगता सोहळा होणार आहे.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकाजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व डोंबिवली पालिका कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत डोंबिवलीत उत्साहात शिवजयंती साजरी झाली.

No comments: