Saturday, February 19, 2011

सातारा शिवजयंती २०११

सातारा झाले शिवमय
Saturday, February 19, 2011 AT 07:15 PM (IST)

सातारा - शिवजयंती निमित्त आज शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तसेच गणेशोत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची, प्रतिमेची स्थापना केली होती. चौका-चौकात भगवे झेंडे तसे पताका लावल्याने संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

राजवाड्या समोर फुलांनी सजविलेल्या मेघडंबरीमध्ये पालिकेतर्फे शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.


पोवई नाका येथील शिवपुतळ्यास छोट्या विद्यार्थ्यांनी वंदन केले.


शिवाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक विद्युत रोषणाई केली होती.


शिवाजी सर्कल पुतळ्यास अभिषेक घालताना पालिकेचे उपाध्यक्ष अविनाश कदम. त्यावेळी नगराध्यक्षा स्मिता घोडके.


शिवजयंतीनिमित्त राजवाड्यास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


मंगळवार पेठेतील शिवज्योत मंडळाने किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती.




शिवजयंती निमित्त राजधानी महोत्सवात मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST)

सातारा - महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, जिल्हाधिकारी व खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहकार्याने येथील तालीम संघाच्या मैदानावर 19 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत "राजधानी सातारा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अतिरिक्त सचिव भरत सूर्यवंशी, सुनील काटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सात दिवस चालणाऱ्या राजधानी सातारा महोत्सवात विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवासाठी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. सांस्कृतिक संचालनालयातर्फे 12 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम उदयनराजे भोसले मित्र मंडळ व महोत्सव समितीचे सदस्य खर्च करणार आहेत. सांस्कृतिक संचालनालयाने साताऱ्याचा विविध कला महोत्सवात समावेश केला आहे. त्यामुळे यापुढील काळातही असे कार्यक्रम जिल्ह्यात होतील. शिवजयंतीपासून या उत्सवास सुरवात होईल.

शनिवारी (ता. 19) दुपारी चार वाजता गांधी मैदानावरून शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ होईल. राजवाडा, पोवईनाका व परत राजवाडा अशी मिरवणूक होईल. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच आमदार, जिल्हाधिकारी संभाजी कडू- पाटील, पोलिस अधीक्षक विठ्ठल जाधव, नगराध्यक्षा स्मिता घोडके आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रविवारी (ता. 20) सायंकाळी सहा वाजता "मी मराठी' हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. नंदेश उमप व सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या वेळी सौ. दमयंतीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमवारी (ता. 21) सायंकाळी सहा वाजता "शंभूराजे' नाटक सादर होईल. यामध्ये प्रमुख भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांची आहे. या कार्यक्रमास राजमाता कल्पनाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी (ता. 22) सायंकाळी सहा वाजता सातारा कला आविष्कार हा स्थानिक कलाकारांचा बहारदार कार्यक्रम होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायक सुरेश वाडकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (ता. 24) दुपारी बारा वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. शुक्रवारी (ता. 25) सायंकाळी सहा वाजता लावणी सम्राज्ञी दीप्ती आहेर यांचा "नार नखऱ्याची' ही बहारदार लावण्यांची मैफील होणार आहे.

महोत्सवाची सांगता शनिवारी (ता. 26) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या वेळी क्रेझ एंटरटेनमेंट प्रस्तुत राजधानी जल्लोष हा कार्यक्रम होणार आहे. यात सारेगम फेम कार्तिकी गायकवाड, पद्मनाभ गायकवाड, कॉमेडी एक्‍सप्रेसमधील अभिजित चव्हाण, आशिष पवार, भूषण कडू, सुहास परांजपे, सिनेतारका मेघा घाटगे, मानसी नाईक, क्रांती रेडकर तसेच अभिजित कोसंबी व ऊर्मिला धनगर उपस्थित राहणार आहेत. या वेळी जलसंपदामंत्री रामराजे नाईक- निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी रवींद्र पवार, शिरीष चिटणीस, रवी साळुंखे, तसेच उदयनराजे भोसले मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते..

No comments: