Saturday, February 19, 2011

पुणे शिवजयंती २०११

पुणेकरांनी अनुभवला शिवजयंतीचा जल्लोष!


Sunday, February 20, 2011 AT 12:30 AM (IST)



लक्ष्मी रस्ता - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे आयोजित शिवजयंती मिरवणुकीत साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे सादर करण्यात आलेला "असा होता शिवाजीराजांचा राज्यकारभार' हा जिवंत देखावा लक्षवेधी ठरला.
---
पुणे - भगवे फेटे घालून अन्‌ हाती ध्वज घेऊन सज्ज असणारे मावळे, सोबतीला बारा बलुतेदार, वारकरी परंपरा, गोंधळ, वाघ्या-मुरळी अशा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण, जोडीला ढोल-ताशांचा गजर व झांजपथकाची साथ अन्‌ "छत्रपती शिवाजी महाराज की जय', "जय भवानी, जय शिवाजी' या घोषणांनी दुमदुमणारा आसमंत अशा उत्साही वातावरणात महापालिकेतर्फे शनिवारी आयोजिण्यात आलेल्या मिरवणुकीने शिवजयंती उत्सवात आनंद अन्‌ जल्लोषाचे रंग भरले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीच्या प्रथेनुसार भवानी पेठेतील भवानी माता मंदिरातून निघालेल्या या मिरवणुकीचे सारथ्य श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. महापौर मोहनसिंग राजपाल, पालिका आयुक्‍त महेश झगडे, स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी, उपाध्यक्ष अप्पा रेणुसे, सभागृह नेते नीलेश निकम, आमदार मोहन जोशी, अंकुश काकडे, पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, विकास पासलकर याप्रसंगी उपस्थित होते.

भवानीमातेची पूजा व रथावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्वराज्य ते महाराष्ट्र, बारा बलुतेदार, नियोजित सैनिकी शाळा असे चित्ररथ, संभाजी व जिजाऊ ब्रिगेडचा आकर्षक सजावटीचा रथ व त्यावरील शिवछत्रपतींचा भव्य पुतळा, बैलगाड्या, उंट, घोडेपथक, रथांवरील जिवंत देखावे, भालापथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने मिरवणुकीत एक आगळा उत्साह भरून राहिला होता. तरुणांनी दांडपट्टा, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून नागरिकांची दाद मिळविली. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे सादर करण्यात आलेला "असा होता शिवाजीराजांचा राज्यकारभार' हा जिवंत देखावा कौतुकाचा विषय ठरला. दरबार बॅंड, न्यू गंधर्व बॅंड, प्रभात बॅंड यांचाही मिरवणुकीत सहभाग होता. ठिकठिकाणी मिरवणुकीचे नागरिकांनी स्वागत केले. रात्री उशिरा लालमहाल परिसरात मिरवणुकीची सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती शहरातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी शनिवारी उत्साहात साजरी केली.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली. महापौर मोहनसिंग राजपाल, कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपती, महापालिका आयुक्त महेश झगडे, डॉ. जयसिंह पवार उपस्थित होते. श्री शिवाजी मराठी सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात उत्तमराव पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी शशिकांत सुतार, आबासाहेब शिंदे उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या वतीने अभय छाजेड यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्षा वंदना चव्हाण व रवींद्र माळवदकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. म्हाडातर्फे अंकुश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पोवाडे सादर करण्यात आले. जिल्हा कॉंग्रेस सेवा दलातर्फे रवींद्र म्हसकर यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. जनता दलातर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

संभाजी ब्रिगेड व शिवराज्य प्रतिष्ठानने दीपोत्सव साजरा केला. लाल महालमधील बाल शिवाजीच्या पुतळ्यास मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी शाहीर दादा पासलकर यांचा कार्यक्रम झाला. महापौर राजपाल, प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, विकास पासलकर आदी उपस्थित होते.

शिवालय प्रतिष्ठानतर्फे भिलारेवाडी येथील अनाथ मुलांना धान्याचे वाटप केले. या वेळी आमदार संग्राम थोपटे, अभिजित कदम, योगेश शेलार आदी उपस्थित होते. जयप्रकाश सेवा संस्थेतर्फे मामलेदार कचेरीत अभिवादन सभा आयोजित केली होती. हमाल पंचायतीतर्फे डॉ. बाबा आढाव यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. गोरख मेंगडे, दादा सातव, अंकुश नताडे आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठातर्फे डॉ. रघुनाथ शेवगावकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब काळजे यांनी पोवाडे सादर केले. भीमक्रांती तरुण मंडळाने आयोजिलेल्या शिवजयंती महोत्सवात बी. जी. कोळसे पाटील, हनुमंत शिवूर, नरसिंह लगडे आदींनी भाषणे केली. सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे पोवाड्यातून प्रबोधन करण्यात आले. संयोजक प्रमोद कांबळे, गणेश कांबळे, विनोद कांबळे उपस्थित होते. असलम खान मित्रमंडळातर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. रमणबाग चौक शिवजयंती उत्सव समितीतर्फे राजकुमार मानधनिया यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. भारतीय रिपब्लिकन पक्ष, नव महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. स्मिता पाटील विद्यालयातर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिव महोत्सव समिती, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, दारुल उलम नझेरिया संघटना, शीख फ्रेंड सर्कल, हिंदू-बंधू संघ, ख्रिस्त फ्रेंड सर्कल, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. अखिल भारतीय युवक मराठा महासंघातर्फे संतोष नानवटे यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. भारतीय एकात्मता संघटनेतर्फे रमेश नरगडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष इस्माईल शेख उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातर्फे बापू जगताप, सुनील भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. पश्‍चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. बुलंद छावा संघटनेतर्फे जितेंद्र कोंढरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. विठ्ठल शिंदे, सागर पासलकर, दिनेश कांबळे आदींनी अभिवादन केले.सकाळ वृत्तसेवा

वातावरण शिवमय
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)


कात्रज - अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या 130 विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नाट्य तीन वेगवेगळ्या ठिकाणी सादर करून वातावरण शिवमय केले.
---
पुणे - विविध स्पर्धा, पोवाडे, शिवचरित्र सांगणारे प्रसंग, व्याख्यानमाला, प्रदर्शने इत्यादींमुळे उपनगरांत वातावरण शिवमय झाले होते.

कात्रज - अभिनवच्या इंग्रजी माध्यम शाळेत शिवजयंती उत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. बालगटासाठी हस्तकला, चित्रकला, प्राथमिकसाठी शहर आणि ग्रामीण जीवन, माध्यमिकसाठी शिवकालीन इतिहासाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अनेक विद्यार्थांनी त्यात सहभाग घेतला. माध्यमिकच्या मुलांनी मोठ्या सभागृहाला किल्ल्याचे रूप दिले होते. भव्य बुरूज, दरवाजे, पहारेकरी, स्वागताला सज्ज सुवासिनी, बालशिवाजी आणि मावळ्यांचे खेळ, किल्ल्यांच्या प्रतिकृती, शिवरायांचे शौर्य सांगणारे प्रसंग; शिवाजी महाराजांचे राज्य, जिंकलेले किल्ले आदींबाबतची माहिती; मोठ्या रांगोळी आणि बालशाहिरांचे पोवाडे इत्यादींमुळे वातावरण शिवमय झाले होते.

प्राचार्या सुनीता शहा म्हणाल्या, ""शिवाजी महाराजांना याच वयात मुलांनी जाणले पाहिजे. शिक्षणाचे माध्यम कोणतेही असो, आपली संस्कृती जपण्याची जिद्द बालपणातच मुलांमध्ये आली पाहिजे हाच उद्देश शिवजयंती साजरा करण्यामागे आमचा असतो.''

पोवाड्यांना दाद
हडपसर - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लोकशाहीर देवानंद माळी-सांगलीकर यांनी सादर केलेल्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

पुणे महानगरपालिका, वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट व विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष परिमंडळ चारचे पोलिस उपआयुक्त संजय जाधव ,पोलिस निरीक्षक शिवाजी कणसे, पत्रकार अविनाश गोडबोले, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत तुपे, नगरसेवक अभिजित शिवरकर, रत्नप्रभा जगताप, पार्वती भडके, वानवडी देवस्थान ट्रस्टचे दत्तात्रेय जांभूळकर, शिवाजी केदारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

महाराजांचे विचार मार्गदर्शक
हडपसर - देश एकसंघ ठेवण्यासाठी व भारताला महासत्ता बनविण्यासाठी शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचारांचे पालन तरुण पिढीने केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय नियोजन आयोग व राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

हडपसर येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. जाधव बोलत होते. माजी स्थायी समिती अध्यक्ष दिलीप तुपे अध्यक्षस्थानी होते. नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश, नगरसेवक चेतन तुपे, बंडू गायकवाड, हवेली पंचायत समिती सदस्य संदीप तुपे, संजय शिंदे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल तुपे आदी उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले, ""यश मिळविण्यासाठी तरुणांकडे विशिष्ट ध्येय हवे. ते साध्य करण्यासाठी परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन, उत्तम शिक्षण, आई-वडिलांविषयीचा आदर, सामाजिक भान, परिवर्तनाचा स्वीकार, मानसिकतेत बदल आणि स्वतःमधील क्षमता ओळखून त्याचा विकास करण्याची तयारी आदी गुण असले पाहिजेत.''

पोलिस अधीक्षक प्रकाश म्हणाले, "" भारताला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या शिवाजी महाराजांसारख्या जाणत्या राजकर्त्यांची गरज आहे.''

आशियायी कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या नितीन घुले यांचा सत्कार करण्यात आला. चित्तथरारक मर्दानी खेळांचे या वेळी आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश तुपे, उपाध्यक्ष प्रशांत पवार, सचिव अभिजीत तुपे यांनी आयोजन केले.सकाळ वृत्तसेवा
गीत, पोवाड्यांनी शिवजयंती उत्साहात

20 Feb 2011, 0301 hrs IST
विविध संस्था व संघटनाच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गीत, पोवाडा, फुलांची उधळण, रॅली आणि मिरवणुकांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आकुडीर् येथील नवनाथ मित्र मंडळाच्या वतीने सुमेध बागल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. आयुष भुजबळ या बालकाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रसाद बागल याने पोवाडा सादर केला. सांगवी येथे नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्राचार्य एस. आर. परदेशी आदी उपस्थित होते.

पुणे शहर जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर महिला अध्यक्षा डॉ. स्नेहल पाडळे व महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्षा कमल व्यवहारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. कमल व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. मंगल आडके, गीता कांबळे, मुमताज शेख, चित्रा माळवे आदी उपस्थित होते. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीर्, लाल महाल ब्लॉक, अप्पा बळवंत चौैक, व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश दळवी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सुनील खडके, श्रीपाद काणे, राजाभाऊ इंदुलकर, बाळासाहेब ढमाले आदी उपस्थित होते.

पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बीसीयुडीचे संचालक डॉ. वासुदेव गाडे, चंदशेखर चितळे, डॉ. विजय खरे, डॉ. सुमित्रा कुलकणीर्, डॉ. विलास खरात आदी उपस्थित होते.

धानोरी येथील नारायणराव गेनबा मोझे महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त किल्ले प्रदर्र्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेच्या समिती अध्यक्षा प्रा. अलका पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीमधील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, डॉ. एन. वाय. काझी आदी उपस्थित होते.

पुणे महापालिका, वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट विठ्ठल शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती व पोवाड्याचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी संजय जाधव, शिवाजी कणसे आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या वतीने दादा पासलकर यांचा शिवशाहीरांचा कार्यक्रम झाला. पुरुषोत्तम खेडेकर, मोहनसिंह राजपाल, प्रविण गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने सरचिटणीस उत्तम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. परिमंडल ई येरवडा विभागातही शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजाराम जाधव, रमेश वैराट आदी उपस्थित होते. अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष नानवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. रिपब्लिकन पाटीर् ऑफ इंडियाच्या वतीने पर्वती मतदान संघाचे अध्यक्ष उद्धव चिलवंत यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बाबुराव घाडगे, चंदकांत पालके, मधुकर धनेराव आदी उपस्थित होते. एमसीई सोसायटीच्या वतीनेही शिवजयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम खेडकर, पी. ए. इनामदार आदी उपस्थित होते.

म्हाडामध्ये पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळात अंकुश काकडेच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली। सुखसागरनगर येथील काकडे देशमुख शिक्षण संस्थेच्या उत्कर्ष इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली. यावेळी प्राचार्य मंजुषा पानसरे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. शरदचंद काकडे, नितीन शेलार आदी उपस्थित होते. आझम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त शंभर किलो फुले उधळून जयंती साजरी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष रवींद माळवदकर, विठ्ठल गायकवाड, हरपालसिंह आलुवालिया आदी उपस्थित होते.


दुर्गांच्या माहितीसाठी तरुणाने लिहिले इंग्रजी पुस्तक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)

पुणे - शिवरायांना अन्‌ आपल्या ज्वलंत इतिहासाला विश्‍वव्यापी बनविण्यासाठी भाषेच्या कक्षा ओलांडून पलीकडे गेले पाहिजे, ही गरज ओळखून दुर्गभ्रमंतीकार भगवान चिले यांनी राज्यभरातील 40 दुर्गांवर "फेमस फोर्टस्‌ इन महाराष्ट्र' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.

पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील निवडक 40 दुर्गांची इत्थंभूत माहिती या पुस्तकात आहे. 40 नकाशे व 80 रंगीत छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे. गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग या प्रकारांतील दुर्गांच्या छायाचित्रांसह गडांवर नांदलेल्या राजवटी, तेथे घडलेल्या घटना, शिवछत्रपतींच्या राजवटीत निर्माण झालेले दुर्ग, त्यांची लष्करीदृष्ट्या करण्यात आलेली अजोड बांधणी याबाबतच्या सर्व माहितीचा त्यात समावेश आहे.
इतिहास-भूगोल हे विषय शालेय विद्यार्थ्यांना विशेष आवडत नाहीत. इंग्रजी भाषेकडे कल असणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत ही पिढी गडकोट अन्‌ इतिहास या विषयाशी जोडली जावी, या हेतूने सोप्या इंग्रजीत पुस्तक लिहिल्याचे चिले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. चिले म्हणाले, ""आज एक पिढी इंग्रजी माध्यमात शिकते आहे, त्यांच्यासमोर इतिहास अतिशय त्रोटक स्वरूपात आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही आपला इतिहास समजून घेण्याचे साधन असावे, या हेतूने या लिखाणाचा संकल्प सोडला होता. ''

पर्यायी शब्दांची निर्मिती
बालेकिल्ला, महादरवाजा, तटबंदी, जंग्या, गोमुखी दरवाजा, कडेलोट, खिंड, खोबणी, किल्लेदार, पडकोट, सदर अशा सुमारे 120 शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील दुर्गांवर इंग्रजी भाषेत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच पुस्तके आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे पुस्तक दुर्गप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटक अशा सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. चिले यांनी हे पुस्तक कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्यावर प्रकाशित केले.

No comments: