Monday, February 21, 2011

नंदुरबार शिवजयंती २०११

नंदुरबार मध्ये शिवकुटूंब मेळाव्यात चंद्रशेखर शिखरे ह्यांचे व्याख्यान,शिवजयंतीचा उत्साह .
नंदुरबार (प्रतिनिधी)-(20-February-2011)
Tags : Nandurbar

महाराष्ट्रात छत्रपतींच्या नावावर मराठीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप इतिहास संशोधक चंद्रशेखर शिखरे यांनी केला तर आजच्या परिस्थितीत प्रशासनामध्ये शिवाजीचे मावळे तयार होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार ज्योती तोटेवार यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात आज शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवकुटूंब मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 60 वर्षापुर्वी शिवधर्म विचाराने विवाह करणार्‍या शाहीर हरिभाऊ पाटील आणि सौ.उषाताई पाटील यांचा खास गौरव करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर हरिभाऊ पाटील होते. मेळाव्याचे उद्घाटन इतिहास संशोधक चंद्रशेखर शिखरे, शाहीर राजेंद्र कांबळे, पत्रकार श्रीमती ज्योती तोटेवार यांच्याहस्ते करण्यात आले.प्रारंभी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी शिवरायांवर पोवाडे सादर केले.त्यानंतर श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध या विषयावर नाटीका व पोवाडा सादर केला. श्री.शिखरे यावेळीे म्हणाले, इतिहासातून आपल्याला चुका सुधारण्याची संधी मिळत असते. जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो कधीच पुढे जावू शकत नाही.समाजाला गुलाम करायचे असेल तर त्याच्या इतिहासाचा खून केला जातो.याप्रमाणे इतिहासाचा खून करण्याचा घाट रचला गेला आहे.मुख्य इतिहास बदलून बनावट इतिहास समाजापुढे सादर करण्यात आला आहे.आपल्यापुढे ठेवण्यात आलेले प्रतिक लंगडे असेल तर आपणही लंगडे होतो,हे इतिहासातून शिकले पाहिजे.शिवरायांचा विकृत इतिहास समाजासमोर आणण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. श्री.शिखरे पुढे म्हणाले, अफजलखानाचा वध कसा झाला हे दस्तुरखुद्द शिवरायांनी आपल्या ‘शिवभारत’या पुस्तकात लिहून ठेवले आहे.जिजाऊने खान आणि शिवरायांची प्रतापगड येथे भेट घेण्याचे ठरविले.शिवबाला आशीर्वाद दिला आणि स्वराज्यासाठी पुत्र गमावला तरी चालेल पण खानरुपी छळवाद, पिळवणूक खत्म करण्याची आज्ञा दिली.त्यानंतर अफजलखानाला वाघनखाने जखमी करण्यात येवून जीवा महाले नावाच्या डोंबार्‍याने त्याचा वध केला.अफजलखानाच्या सैन्याला माघारी पाठविले.त्याच्या कुटूंबालाही सन्मानाने परत पाठवले. खानाच्या कबरीसाठी त्यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी 2 एकर जागा दिली.दोन मन तेल भवानी मातेच्या मंदिरातून दरवर्षी देण्याचे जाहीर केले.असे शिवरायांचे औदार्य होते. ही कबर उध्वस्त करुन त्यांचे शौर्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे,असेही ते म्हणाले. श्री.शिखरे पुढे म्हणाले, शिवरायांची लढाई ही धार्मिक होती, असे सातत्याने सांगीतले जाते.मात्र शिवरायांच्या सैन्यात जसे मुसलमान तसे खानाच्या सैन्यात हिंदू सरदारही होते. धार्मिक लढाई असती तर एका समाजाचे सरदार एका पारडयात राहिले असते.त्यामुळे शिवरायांचा लढा हा राजकीय होता.छळवणूक, शोषणमुक्तीसाठी त्यांनी बंड पुकारले होते.स्वराज्यापेक्षा कोणतीही व्यक्ती, जात, समाज मोठा नाही. इतिहासात शिवरायाने खानाला कपटाने मारले असे पंडीत नेहरु सांगत.हेच नेहरु 1962 ला चीनला गेले.त्यानंतर हिंदी चिनी भाई-भाई म्हणत चिनने आक्रमण केले.अटलबिहारी वाजपेयींनी समझोता एक्सप्रेस सुरु केली, त्यानंतर परवेज मुशर्रफने एक पुस्तक भेट दिले.त्यात ‘शत्रुला गाफील ठेवून लढले पाहिजे’ असे एक वाक्य होते.ती ओळ रेखांकीत केली होती. शिवरायांच्या लढयाचा बोध पाकिस्तान व चीनने घेतला.पण भारताने स्विकारला नाही, याची खंत वाटते असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, शिवरायांनी आरमार उभारले.त्यात 100 जहाज उतरवले.त्यांनी पोर्तुगिजांना कोणताही कर दिला नाही.उलट संभाजीराजांनी त्यांच्याकडूनच करवसुली केली.मात्र,त्यानंतर सत्तेवर आलेल्या पेशव्यांनी शिवरायांचे आरमार समुद्रात बुडवले. तसे झाले नसते तर इंग्रज भारतात आले नसते.एवढी भरभक्कम बांधणी शिवरायांनी करुन ठेवली होती.शिवरायांचे राज्य गुजरात,मध्यप्रदेश,कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूपर्यंत होते. पण त्यांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेवले गेले, असेही ते म्हणाले. श्री.शिखरे पुढे म्हणाले, मराठयांचा इतिहास हा स्त्रियांच्या शौर्याचा आहे.जिजाऊने शहाजी राजे नसतांना अत्यंत कुशलपणे राज्य चालवून शिवरायांना घडवले. संभाजीराजांची पत्नी येसूबाईनेही उत्तमपणे राज्याचा सांभाळ केला. ताराराणीच्या काळात औरंगजेब संपला. अहिल्याबाई होळकरांनी 26 वर्ष लोककल्याणकारी राज्य केले. म्हणूनच स्त्रियांना घराबाहेर काढा, त्यांचे व्यक्तीमत्व फुलू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अलिकडे छत्रपतींच्या नावावर मराठीचे राजकारण केले जात आहे. पण शहाजीराजांना 12 भाषा, शिवरायांना 6 तर संभूराजांना 16 भाषा अवगत होत्या.शिवरायांनी स्वतःसाठी ‘साहेब’ हा शब्दप्रयोग केला, तो पारशी भाषेतील होता. आरमार हा शब्द पोर्तुगीज भाषेतील होता.त्यामुळे आज मराठीचे राजकारण करणारेदेखील आपल्या नावात ‘साहेब’ लावत आहेत. त्यांची मुले इंग्लिश स्कुलमध्ये शिकत आहेत.जगाची भाषा ही इंग्रजी आहे, ती प्रत्येकाला आलीच पाहिजे, असेही श्री.शिखरे म्हणाले. ज्योती तोटेवार यांचे व्याख्यान पत्रकार ज्योती तोटेवार यांचे ‘विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा’ या विषयावर व्याख्यान झाले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षाबंाबत तसेच पालकांना मार्गदर्शन केले.सौ.तोटेवार म्हणाल्या की, बहुजन, मराठा समाजातील तरूणांनी आयपीएस होवू नये, असा काही नियम नाही. मात्र आपल्या मुलांमध्ये न्युनगंड निर्माण झाला आहे.उच्चशिक्षीत गर्भश्रीमंत लोकांचीच मुले अधिकारी होतात हा गैरसमज आहे.स्पर्धेच्या युगात बहुतेक विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससीबाबत माहिती नसते, ही शोकांतिका आहे.जिजाऊंनी शिवबांना बाळकडू दिले.त्यातून त्यांच्यावर संस्कार घडले.त्यामुळे प्रशासनात आज शिवाजीच्या मावळयांची गरज निर्माण झाली आहे.आजच्या विद्यार्थ्यांना विचार करायला वेळ मिळत नाही.त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यास पालकांकडून विरोध दिला जातो. एखाद्या तरूणाना खेळात रूची असते. मात्र आई-वडील डॉक्टर आहेत म्हणून त्याने डॉक्टर व्हावे, असा आग्रह धरला जातो. हे धोरण बदलले पाहिजे.पालकांची मुलांचा कल समजला पाहिजे. यात आईची भुमिका महत्वाची ठरते.प्रत्येकात वेगळा गुण असतो.तो विकसीत न झाल्यास त्याचे जीवन निरर्थक होते. मुलांच्या अतरमनाचा विचार करणे आवश्यक आहे.मुलांवर संस्कार घडविण्याचे काम आईचे असते. आपण स्वतःला शिवबाचे वंशज म्हणून घेतो.त्यामुळे मुलांना शिवबासारखे घडवा. त्यावर संस्कार टाका, असे आवाहन केले.ज्योती तोटेवर पुढे म्हणाल्या की,जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्ग निवडा. एखादा बहुजन समाजातील मुलगाही सचिन तेंडूलकरप्रमाणे फलंदाजी करू शकतो, असा विश्वास निर्माण करा.सामान्य कुटूंबातील खडी फोडणारा बालाजी मंगळे हा जिद्दीने शिक्षण घेवून लातुरचा कलेक्टर होवू शकतो, हे उदाहरण डोळयासमोर ठेवा.त्यामुळे आपला एकाग्रता कायम ठेवा. आयुष्यातून मार्गक्रमण करतांना योग्य दिशा निवडा. महिलांना मागे खेचले जाते. मात्र लौकीक वाढविणार्‍या महिलांना प्रेरणा दया, असे आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सौ.तोटेवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूचे स्थान महत्वाचे आहे.पहिला गुरू आई व नंतर शिक्षण देणारे शिक्षक गुरू असतात. आज स्पर्धेचे युग असले तरी विद्यार्थ्यांनी न्युनगंड बाळगू नये. नियोजन करून विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे.यामुळे निश्चित अधिकारी व्हाल, असे सांगितले. शेवटी मेळाव्याचे अध्यक्ष शाहीर हरिभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रबोधन घडविण्याचे सुरू ठेवण्यात येईल.अशा विविध उपक्रमांतून बहुजन समाजाला जागृती निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज पवार, प्रा.प्रशांत बागुल यांनी केले.हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने सांगता झाली.आभार शिवराम पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी संजय कुवर, राजेंद्र पाटील, आर.आर.पाटील, हंसराज पाटील, शशिकांत पाटील, नंदलाल पाटील, प्रकाश पाटील, उमेश भदाणे, मधुकर पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, किरण पाटील यांनी नियोजन केले.रमेश पाटील, एन.डी.नांद्रे, कुंदन पाटील, किशोर पाटील,अनिल भामरे, साळूंके, श्याम जाधव, देवा बोराणे, मनोहर पाटील,धनराज पाटील, सतिष पाटील,प्रफुल्ल पाटील, डॉ.चेतन बच्छाव, कल्याण पाटील, योगेश बाविस्कर, सौरभ पाटील, प्रांजल पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. डॉ.कमलाताई मराठे, संध्या पाटील,डॉ.शोभाताई मोरे, चंद्रशेखर बेहरे, प्रा.बी.एस.पाटील आदी उपस्थित होते. आ.प्रा.शरद पाटील यांनी आर्थिक मदत केली. प्रतिभा शिंदे यांचीही उपस्थिती होती.


नंदुरबार मध्ये शिवजयंती उत्साहात...

नंदुरबार (प्रतिनिधी)- (21-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

तालुक्यातील खोंडामळी येथील नुतन माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराज व जिजाऊंचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. मिरवणूक खोंडामळी गावात काढण्यात आली. गावातील शिवरायांच्या पुतळयाचे पुजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम.पिंपळे, पर्यवेक्षक के.एन. साळूंके, डॉ.एन.डी.नांद्रे, ए.बी. पाटील, आर.पी.भामरे, बी.एस. कदमबांडे, एस.पी. पवार शिक्षकांनी केले. प्रा.एन.डी. वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन आर.एच.मोरे यांनी केले।

शिवरायांना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) - (21-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

येथील प.खा भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवरायांच्या अशा चरित्राविषयी श्रीकृष्ण काबरा व मुख्याध्यापिका सौ.भागिनी महाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला।


छडवेलला शिवजयंती साजरी
नंदुरबार (प्रतिनिधी) -(20-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

छडवेल येथील नुतन मराठा विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य शत्रुघ्न पाटील होते. यावेळी शत्रुघ्न पाटील, बालू पाटील, डी.एन.पाटील, बापू खैरनार, लहू पानपाटील, आबा खैरनार, अनिता निकवाडे, प्रभाकर पवार, सुरेश सोनवणे, त्र्यंबक माळी यांनी प्रतिमा पुजन केले. प्राचार्य पाटील यांनी थोरपुरूषांची चरित्रे आपण वाचली तर आपले चरित्र घडत असते असे सांगून अधिकाधिक चरित्रे वाचण्याचे आवाहन केले।

छत्रपतींना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) - (20-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

येथील क्षत्रिय सुर्यवंशी मराठा मंगल कार्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मेजर रामदास पवार यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, चंद्रकांत मराठे, जिल्हा ग्रामोद्योग फेडरेशनचे अध्यक्ष रोहिदास पवार, संत दगा महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन मराठे, हिरालाल मराठे, अर्जुन मराठे, जितेंद्र मराठे, चंदु मराठे, नितेश मराठे, योगेश मराठे, पावबा मराठे, जितेश मराठे, राहुल मराठे आदी उपस्थित होते.

No comments: