Monday, February 21, 2011

अहमदनगर शिवजयंती २०११

मिरवणुकांच्या दणदणाटात शिवजयंती उत्साहात साजरी



नगर, १९ फेब्रुवारी/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त काढलेल्या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांची विविध पथके सहभागी झाली होती. वाद्यवृंदाचा गजर, शिवरायांचा घोष यामुळे वातावरण दुमदुमून गेले होते. परिसरातही ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजीमहाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ मुख्य कार्यक्रम झाला. सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, महापौर संग्राम जगताप, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते शिवराय व राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास अभिषेक करून पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर नजीर शेख, स्थायी समितीचे सभापती संजय गाडे, जि. प. बांधकाम विभागाचे सभापती बाळासाहेब हराळ, पोलीस उपअधीक्षक श्याम घुगे, जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे उपाध्यक्ष रामनाथ वाघ, सचिव जी. डी. खानदेशे, मनपा उपायुक्त आर. ए. देशमुख, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, वकील संघाचे माजी अध्यक्ष माणिक मोरे, प्राचार्य साठे, बहिरनाथ वाकळे, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्षा माया कोल्हे, आदी उपस्थित होते.अभिवादनानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. या चौकात मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती दूर केली.
मिरवणुकीत जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पथके, महाविद्यालयीन तरूण, अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. झांजपथकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या वेळी शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमा असलेले रथ, वाहने सहभागी झाली होती. महापालिका शिक्षण मंडळाचा रथ मिरवणुकीत सहभागी झाला. वारकरी दिंडी, हातात तलवारी घेतलेले मावळे पथक, त्यानंतर भाले घेतलेले पथक, झांजपथक अशा थाटात मिरवणूक काढण्यात आली. रेसिडेन्सिअल विद्यालयाच्या प्रांगणात येऊन तिचा समारोप झाला. सावेडी, केडगाव तसेच नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय पवार, तोफखान्याचे निरीक्षक अशोक ढेकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
निमगाव वाघा येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व नवनाथ विद्यालयातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक भास्कर सुपेकर, महासंघाचे तालुकाध्यक्ष नाना डोंगरे, किसन वाबळे, काशिनाथ पळसकर आदी उपस्थित होते. नेप्ती येथील प्राथमिक शाळेत आबा लोंढे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच मीरा जपकर होत्या. जि. प. सदस्य अरूण होळकर, मुख्याध्यापिका हिराबाई सोनवणे, रामदास फुले, बाबासाहेब पवार उपस्थित होते. केडगाव येथील कांबळेवस्तीत शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी अशोक गायकवाड होते. धोंडीराम कांबळे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले.

शिवज्योतीचे स्वागत
शिवजयंतीनिमित्त विळद घाट येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी ते नगर अशी शिवज्योत आणली. त्यामध्ये रवींद्र भोर याने १८, तर शिवप्रसाद जाधव याने २२ किलोमीटर दौड केली. विद्यार्थ्यांच्या पथकाचे या वेळी स्वागत करण्यात आले.

शिवछत्रपती, राजमाता जिजाऊ पुरस्काराचे पुढील वर्षांपासून शिवजयंतीस वितरण - जाधव



नगर,१९ फेब्रुवारी/प्रतिनिधी
शिवछत्रपती व राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण पुढील वर्षीपासून शिवाजी महाराजांच्या जयंतीस करण्याचे तसेच पुरस्कार निवडीतील राजकीय हस्तक्षेप टाळला जाईल, असे आश्वासन क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी काल (शुक्रवारी) येथे दिले.
वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या वादाबाबत जाधव यांनी काल नियोजन भवनात क्रीडा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी शिवछत्रपती पुरस्कार शिवजयंतीस देण्याची प्रथा खंडित झाल्याकडे लक्ष वेधले. आपण तत्कालीन क्रीडामंत्री रामकृष्ण मोरे यांच्याकडे हा प्रश्न विधानसभेत मांडला होता. मात्र, त्यानंतर केवळ सन२००३-०४ मध्ये शिवजयंतीला हे पुरस्कार दिले गेले. त्यानंतर पुन्हा ही प्रथा खंडित झाली. ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुढील काळात शिवछत्रपती व जिजाऊ पुरस्कार शिवजयंतीस वितरित करण्याची काळजी घेऊ, सध्याच्या पुरस्काराची निवड निश्चित झाली आहे. मात्र, काही कारणाने यंदाचे हे वितरण शिवजयंती होऊ शकत नाही. आपल्याकडे क्रीडा खाते कायम राहिल्याने निवडीत राजकीय हस्तक्षेप होणार नाही याचीही काळजी घेऊ. निवड केवळ तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडूनच व गुणवत्तेच्या आधारावरच केली जाईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले.

छत्रपती शिवाजीमहाराज हे वैश्विक राजे - प्रा. हरी
नरके




जामखेड, २० फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजीमहाराजांचा संघर्ष धार्मिक नव्हता, तर त्यावेळच्या परिस्थितीशी होता. शिवाजीमहाराज हे वैश्विक राजे होते. ते कोणत्या एका जातीचे राजे होते, अशी भूमिका घेता येत नाही. इतिहासाचे फेरलेखन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन समितीचे अध्यक्ष प्रा. हरी नरके यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजीमहाराज शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. नरके बोलत होते. जि. प. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डी. एस. भुजबळ अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, सरपंच प्रा. कैलास माने, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, डॉ. पी. जी. गदादे, सय्यद मन्सूरभाई, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. देशमुख, संस्थेचे अध्यक्ष भानुदास बोराटे, छत्रपती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पी. जे. नागरगोजे उपस्थित होते.
प्रा. नरके म्हणाले की, शून्य टक्क्य़ाने कर्ज देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी होय. पेरणी, तसेच अन्य कामासाठी गरजेप्रमाणे कर्ज दिले जाते. एखाद्यास कर्जाने दिलेली मुद्दल फेडणेही शक्य नसेल, अशा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे असे राजांनी सांगितले होते. छत्रपती शिवरायांनी संपत्ती मिळविली, परंतु ती एकटय़ाची मानली नाही. ती त्यांनी रयतेची मानली. आता मात्र पुण्याई शाहू, फुले, आंबेडकरांची आणि प्रत्यक्ष काम वेगळेच अशी स्थिती आहे. प्रा. राहुल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. के. बी. सगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. बी. तरटे यांनी आभार मानले।

पारनेर मध्ये शिवजयंती उत्साहात




पारनेर, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत अवघ्या १० वर्षांच्या प्रांजली साठे या विद्यार्थिनीने मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड व विविध शिवप्रेमी संघटनांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात पारनेरकरांची मने जिंकली. भाषणानंतर तिच्यावर बक्षिसांचा अक्षरश: वर्षांव झाला.
मराठा सेवासंघाने घेतलेल्या ४ गटांतील वक्र्तृत्व स्पर्धेत प्रांजलीने खुल्या गटातील स्पर्धकांची बोलतीही बंद केली. पारनेर बसस्थानक परिसरात पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्यात मोठय़ा जनसमुदायासमोर प्रांजलीने प्रभावी भाषण केले. मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड, तसेच दोस्ती ग्रूपच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवाचा प्रारंभ तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्याच्या पूजनाने झाला. पोलीस निरीक्षक तुकाराम वहिले, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, जि. प. सदस्य वसंत चेडे, सरपंच राजेंद्र तारडे, उपसरपंच विजय डोळ, सैनिक बँकेचे अध्यक्ष अर्जुन चौधरी, दीपक नाईक, बबन वाबळे, दादाभाऊ शेटे, सुदाम कोरडे आदी उपस्थित होते. मराठा सेवासंघाचे विभागीय अध्यक्ष संभाजी औटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवजयंतीनिमित्त ग्रामीण रूग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरासही चांगला प्रतिसाद मिळाला. सुधाकर डुंबरे यांचे शिवचरित्रावरील व्याख्याने, तसेच शहरातून काढलेल्या मिरवणुकीस पारनेरकरांचा प्रतिसाद मिळाला. शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत माऊली बालकाश्रमाच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक कसरती, लाठी-काठी, तलवारबाजी यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. जयप्रकाश साठे यांनी सूत्रसंचालन केले. शंभू दुधाडे यांनी आभार मानले. किरण सोनवणे, संजय रेपाळे, केशव अडसूळ, संपत म्हस्के, के. बी. बांडे, कांतिलाल कोकाटे, संजय कावरे, अभय गट, विजय वाबळे, संजय ढवळे आदींनी परिश्रम घेतले.
निघोज, वडनेरला उत्साहात
निघोज/वार्ताहर -
येथील मळगंगा विद्यालय, तसेच वडनेरच्या जि. प. प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे आयोजित कार्यक्रमात कॅप्टन विठ्ठलराव वराळ, निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक सरोदे, निवृत्त प्राचार्य शिवाजी पिंपरकर, हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी वराळ, मळगंगा पतसंस्थेचे संचालक रामदास लंके, व्यवस्थापक दिलीप वराळ, भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वरखडे, मुख्याध्यापिका रेखाताई वराळ आदी उपस्थित होते. डॉ. सरोदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पिंपरकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. किसन वरखडे यांनी आभार मानले.
कोल्हारला ५ तास मिरवणूक
कोल्हार/वार्ताहर -
छत्रपती शिवाजीमहाराज की जय, अस जयघोष, झांजपथकाचा निनाद, मावळ्यांच्या पोशाखातील घोडेस्वार, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषात शिवजयंतीनिमित्त आज शिवप्रतिमेची येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.दुपारी ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरापासून शिवप्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मावळ्यांच्या पोशाखातील ४ घोडेस्वार मिरवणुकीच्या अग्रभागी होते. नानगाव (दौंड) येथील झांजपथक, भंडारदरा येथील कलाकारांनी सादर केलेले आदिवासी काम्बड नृत्य हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीत शिवजयंती महोत्सव समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटना, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. कोल्हार भगवतीपूर शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सकाळी ग्रामदैवत भगवतीमाता मंदिरासमोरील भव्य प्रांगणात उत्सवास प्रारंभ झाला. शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. सरपंच सुरेंद्र खर्डे, डॉ. संजय खर्डे, उपसरपंच श्रीकांत खर्डे, वसंतराव खर्डे, अशोकलाल आसावा, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ जिजाबा खर्डे, भास्कर दिगंबर खर्डे, बाळकृष्ण खर्डे, सयाजी खर्डे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले।

राजमुद्रा ग्रुपच्या वतीने कर्जतला



शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
कर्जत, १९ फेब्रुवारी/वार्ताहर

येथे शिवजयंतीनिमित्त राजमुद्रा ग्रुपने अध्यक्ष विजय तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी राजेंद्र फाळके, नामदेव राऊत, अशोक खेडकर, बाळासाहेब साळुंके, विजय तोरडमल, शरद भैलुमे, सचिन पोटरे, सचिन जाधव, स्वप्नील देसाई, दीपक शिंदे, ज्ञानदेव लष्कर आदी उपस्थित होते. बसस्थानकाजवळ रिपाइंच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. यावेळी राजमुद्राचे विजय तोरडमल उपस्थित होते.
तालुक्यातील दिघी येथेही शिवछत्रपती तरूण मंडळाच्या वतीने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिवप्रतिमेस प्रा. चंद्रकांत राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रोहित राजेनिंबाळकर, दीपक राजेनिंबाळकर, महेश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते।

मराठा महासंघातर्फे पाथर्डीत भव्य मिरवणूक



पाथर्डी, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
शहर व तालुक्यात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. युवक राष्ट्रवादी काँग्रेस व मराठा महासंघाच्या वतीने या वेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
केळवंडीच्या तरूणांनी शिवनेरीहून आणलेली शिवज्योत पाथर्डी ते केळवंडी अशी मिरवणुकीने नेण्यात आली, तर शिरापूर, खांडगाव व टाकळीमानूर येथेही मिरवणुका काढण्यात आल्या. कसबा विभागातील स्वराज युवा प्रतिष्ठानने प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला होता. युवक राष्ट्रवादी व मराठा महासंघाने काढलेल्या मिरवणुकीत शिवाजीमहाराजांचा न्याय हे पथनाटय़, मावळ्यांचे पथक, बँड, ढोलीबाजापथक सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर भगवे झेंडे लावले होते. मिरवणुकीत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश बोरूडे, मराठा महासंघाचे अध्यक्ष बंडू बोरूडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक नंदकुमार शेळके, संजय भागवत आदी सहभागी झाले होते.
तिसगाव येथे दिलीप अकोलकर मित्रमंडळ व तिसगाव विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. येथे राजीव राजळे यांचे व्याख्यान झाले. कसबा विभागातील शिवपुतळ्यास आमदार चंद्रशेखर घुले यांनी, तर पंचायत समिती आवारातील पुतळ्याला सभापती काकासाहेब शिंदे यांनी पुष्पहार घातला. राजीव राजळे मित्रमंडळाचे कार्यकर्ते नगरसेवक बंडू बोरूडे, सीताराम बोरूडे यांनीही शिवजयंती साजरी केली.

छत्रपतींच्या विचारांची शिदोरी प्रत्येक घटकाला उपयोगी - विखे



राहाता, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचारांची शिदोरी तरूण पिढीला आणि समाजातील प्रत्येक घटकाला उपयोगी पडत आहे, असे प्रतिपादन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या ३८०व्या जयंतीनिमित्त डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश आपटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
विखे यांच्या हस्ते शिवाजीराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ते म्हणाले की, रयतेचे शिलेदार म्हणून राजांचे व्यक्तिमत्व आपल्यापुढे उभे राहते. स्वराज्य मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांनी नवा विचार दिला.
यावेळी कारखान्याचे संचालक शांतीनाथ आहेर, अण्णासाहेब कडू, केरूनाथ चेचरे, शशिकांत घोलप, सर्जेराव खर्डे, दीपक पाटील, रामदास निकम, कार्यकारी संचालक आर.डी. शितोळे, सरव्यवस्थापक बी. एन. सरोदे आदी उपस्थित होते।

ढोलताशांचा गजर, तसेच खंडेश्वराचा यळकोट या वातावरणात पिंपरी जलसेन येथे आयोजित बैलगाडय़ांच्या शर्यतीला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्गाटन झाले. जि. प. सदस्य राजाराम एरंडे, जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके, पं. स. सदस्य सुभाष बेलोटे, उद्योगपती विष्णुशेट कदम, सरपंच लहू थोरात आदी उपस्थित होते. आंबेगाव, जुन्नर, पारनेर, शिरूर या ४ तालुक्यांतून शेकडो बैलगाडय़ांनी शर्यतीत सहभाग घेतला.
मालमोटारी, टेम्पो या वाहनांतून वाजतगाजत बैलगाडे येत होते. घाटाच्या सभोवती कडय़ावरून हजारो गाडाशौकिन शर्यतीचा आनंद लुटत होते. दुपारी दीडवाजता सुरू झालेली शर्यत सुमारे ४ तास चालली. उदय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सरपंच थोरात यांच्या नेतृत्वाखाली शर्यतीचे नियोजन करण्यात आले. सुमारे लाखभर रूपयांची बक्षिसे देण्यात आली.
बैलगाडा शर्यतीचा घाट दुरूस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून खर्च केला. सकाळी काठय़ांची मिरवणूक, खंडेश्वराचा अभिषेक, महाप्रसादाचे आयोजन, शिवजयंती उत्सव, विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन करीत ही यात्रा गावकऱ्यांनी मोठय़ा उत्साहात साजरी केली।

शिवजयंतीनिमित्त आज नगरमध्ये मिरवणूक



नगर, १८ फेब्रुवारी/प्रतिनिधी
उद्या (शनिवारी) साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी जिल्ह्य़ात सुमारे पावणेतीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उद्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करतील. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने सकाळी आठ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध पथके, शाळकरी मुले व नागरीक मिरवणुकीत सहभागी होतील.
शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे भिस्तबाग चौकात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन काल सत्यपाल महाराजांच्या हस्ते झाले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांचे व्याख्यान आज झाले. छावातर्फे भिंगार येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आलमगीर रस्त्यावरील द्वारकाधीश कॉलनी येथे होईल. दुपारी १० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, तसेच सायंकाळी ५ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी वसतिगृहातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष गणेश िशदे यांनी सांगितले.
शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३ उपअधीक्षक, १० निरीक्षक, १८ उपनिरीक्षक व ४५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ात ८ पोलीस उपअधीक्षक, ४५ निरीक्षक, ५२ उपनिरीक्षक व २ हजार ५०० पोलीस असा बंदोबस्त असेल.