Saturday, February 19, 2011

कोल्हापुर शिवजयंती २०११


शिवछत्रपतींच्या जयघोषात सामाजिक प्रबोधनाचा जागर
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:34 AM (IST)


कोल्हापूर - शिवभक्तीची ज्योत मनात जागवत शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने शिवजयंतीनिमित्त काढलेली मिरवणूक आज लक्षवेधी ठरली. शिवकालीन युद्धकलेचा थरार, फडफडते भगवे ध्वज व शिवछत्रपतींचा जयघोष अशा वातावरणात मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला. "पंचगंगेचे प्रदूषण थांबवा', "निर्माल्य पाण्यात टाकू नका', "स्वयंपाकाचा गॅस वेळेवर द्या', असे आवाहन करत सामाजिक प्रबोधनाची परंपरा यंदाही मंडळाने कायम ठेवली. दरम्यान, किल्ले पन्हाळ्याहून विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते रात्रीच हाती मशाल घेऊन आपापल्या गावी रवाना झाले.

शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक, शाहीर बाळासाहेब देशमुख यांच्या फर्ड्या आवाजातील ध्वनिफितींनी शिवभक्तांना सकाळपासूनच रोमांचित केले. सकाळी पाळणा पूजन झाल्यानंतर सारे वातावरण शिवमय होऊन गेले।




सायंकाळी पाच वाजता उभा मारुती चौकातून शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक सुरू झाली. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे, माजी महापौर भिकशेठ पाटील, उदय साळोखे, महिपतराव बोंद्रे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, उपाध्यक्ष संजय पडवळे, उत्तम कोराणे, रमेश पोवार, सचिन चव्हाण, इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, माजी नगरसेवक अजित राऊत, विक्रम जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस सुरवात झाली.

धनगरी ढोल, बॅंड पथकासह पारंपरिक वेशात लहान मुले-मुली मिरवणुकीत सहभागी झाल्या. वस्ताद आनंदराव ठोंबरे व सुहास ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी रोमांच उभे केले. मिरवणुकीत बैलगाड्यांवर प्रबोधनात्मक फलक लावले होते. "आपण सारे कोल्हापुरी, फुटबॉल हौस भारी, या खेळाचे वैभव टिकविणे, आपली सर्वांची जबाबदारी', "स्वयंपाकाचा गॅस वेळेवर मिळालाच पाहिजे', "पंचगंगा व इतर नद्यांचे प्रदूषण थांबवा', "कारभारणी धान्यापेक्षा धान्यापासूनची दारू आपल्याला परवडतीया', "निर्माल्य पाण्यात टाकू नका', "पाणी गळती थांबवा, स्वच्छ व मुबलक पाणी द्या; मगच दरवाढ करा', "शिक्षणाची गाडी चालली, गोरगरिबांची पाटी कोरी,' या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले.

ज्येष्ठ फुटबॉलपटू रामभाऊ ठकार व सखारामबापू खराडे यांना श्रद्धांजली वाहणारे फलकही मिरवणुकीत होते. मिरवणूक निवृत्ती चौकात आल्यानंतर आतषबाजी करण्यात आली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महापालिका, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी ते पुन्हा उभा मारुती चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीत ऍड. अशोक साळोखे, चंद्रकांत यादव, सुरेश गायकवाड, आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, भरत जाधव, राजेंद्र चोपदार, राजेंद्र चव्हाण, सुरेश जरग, ऍड. धनंजय पठाडे, अशोक देसाई, भय्या माने, मोहन काटकर, बाळासाहेब शिकलगार, मिलिंद सावंत, पंडितराव पोवार, लाला गायकवाड सहभागी झाले होते।




शिवाजी तरुण मंडळातर्फे आज मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 19, 2011 AT 12:00 AM (IST)
कोल्हापूर - गेली 77 वर्षे अखंडितपणे शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने साजरी करण्यात येणारी शिवजयंती यंदाही भव्य स्वरूपात उद्या (ता. 19) साजरी होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उभा मारुती चौकात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी जन्मकाळ साजरा होईल. दुपारी प्रबोधनाचे फलक, विविध वाद्यवृंद, घोड्यांवरील मावळे, छत्रपतींच्या जीवनावरील देखावे व पाच हजार शिवभक्त अशा लवाजम्यात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक निघेल. मंडळाचे अध्यक्ष ए. आर. साळोखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्री. साळोखे म्हणाले, ""दुपारी पावणेचार वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. या वेळी महापौर वंदना बुचडे, श्रीमंत शाहू महाराज, खासदार सदाशिवराव मंडलिक, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर आदी उपस्थित राहतील. शिवजयंतीच्या मूळ हेतूला बाधा पोचू नये, यासाठी मिरणवणुकीत डॉल्बी न लावता, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत दोनवड्याचे झांझपथक, कर्नाटकचा धनगरी ढोल, सांगलीचा बॅंड, मर्दानी खेळ, बेंजो, महाराष्ट्र हायस्कूल व शिवाजी मराठा हायस्कूलचे लेझीम पथकाला स्थान दिले आहे. मिरवणुकीत गैरप्रकार होऊ नयेत अशा सूचनाही सर्वांना दिल्या आहेत.''
ते म्हणाले, ""यापुढील काळात 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी व्हावी, हा विषय घेऊन व्याख्यानमाला घेण्यात येईल. शिवजयंती ग्लोबल व्हावी या उद्देशाने होणाऱ्या व्याख्यानमालेत तज्ज्ञ इतिहास संशोधकांना बोलविले आहे.''

शिवजयंती 19 फेब्रुवारीला होऊ नये म्हणून संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्यांपासून सर्वांनी दूर राहावे, असे आवाहन मंडळाचे सचिव व माजी महापौर भिकशेठ पाटील यांनी केले.

या वेळी शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष नगरसेवक परिक्षित पन्हाळकर, उपाध्यक्ष इंद्रजित बोंद्रे, सुरेश जरग, शिवाजी तावडे, मोहन काटकर, मोहन साळोखे आदी उपस्थित होते.

No comments: