Saturday, February 19, 2011

औरंगाबाद शिवजयंती २०११

मराठ्यांच्या इतिहासाची पुनरमांडणी आवश्यक : उमेश कदम


मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे

Sunday, February 20, 2011 AT 01:24 AM (IST)

औरंगाबाद - मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. उमेश कदम यांनी शनिवारी (ता. 19) केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कदम यांचे " 17 व्या शतकातील फ्रेंच - मराठे संबंध' या विषयावर व्याख्यान झाले तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे होते. कुलसचिव डॉ. मानवेंद्र काचोळे, छत्रपती शिवाजी अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. नीरज साळुंके, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुरेश गायकवाड यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.

डॉ. कदम म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे आदर्श राज्य होते. मराठा राज्याच्या स्थापनेपासून शिवाजी महाराजांनी राष्ट्रवादी विचारांची पेरणी केली. मराठ्यांचा राजकीय इतिहास फार महत्त्वाचा आहे. प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर हा इतिहास महत्त्वाचा आहे. हा इतिहास एका जातीचा नव्हे तर तो मराठी भाषकांचा आहे, मध्ययुगीन काळाचा तो इतिहास आहे. फ्रेंच व मराठे यांच्यातील संबंध प्रदीर्घकाळ टिकविण्यासाठी दोन्हीही बाजूंनी प्रयत्न झाले. फ्रेंचांनी कोणतीही अट न घालता शिवाजी महाराजांना शस्त्रे पुरविली. कोकणातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शिवाजी महाराजांनी फ्रेंचांची मदत घेतली असा उल्लेख त्यांनी केला.

कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, थोर पुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम विद्यापीठ शिस्तबध्दपणे करीत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अशा व्याख्यानातून लाभ होतो.

डॉ. सुरेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साळुंके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. आनंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले. शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण या वेळी करण्यात आले.

पाहुण्यांना ग्रंथांची भेट
विद्यापीठात व्याख्यानासाठी किंवा कोणत्याही समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांना विद्यापीठातर्फे स्मृतिचिन्ह भेट दिले जायचे. आता स्मृतिचिन्हाऐवजी ग्रंथ भेट देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. डॉ. उमेश कदम यांना ग्रंथ भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांना मात्र बक्षिसाच्या रूपाने स्मृतिचिन्हच देण्यात आले. विद्यार्थ्यांना देखील पुस्तकच भेट द्यायला हवे होते अशा प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर व्यक्त होत होत्या.

फुलांची उधळण करीत शिवजयंती मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 02:00 AM (IST)

औरंगाबाद - ढोल ताश्‍यांच्या गजराने दणाणला आसमंत, बालगोपालांनी सादर केली अप्रतिम लेझीम आणि मिरवणुकीत गुलालाऐवजी झाली फुलांची उधळण, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत शनिवारी (ता.19) सहभाग घेतला.

औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संस्थान गणपती येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नेते मधुकरअण्णा मुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. या वेळी आमदार डॉ. कल्याण काळे, संजय वाघचौरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, पोलिस आयुक्‍त श्रीकांत सावरकर, पोलिस उपायुक्‍त वसंत परदेशी, मनमोहनसिंग ओबेरॉय, पृथ्वीराज पवार, रंगनाथ काळे, सहाय्यक पोलिस आयुक्‍त रमेश घोराळे, पोलिस निरीक्षक खुशालसिंग बाहेती, प्रकाश मुगदिया, सुभाष झांबड, जी.एस.ए.अन्सारी, नगरसेवक अभिजित देशमुख, विनायक गुंजाळ, शिवाजी बनकर, राहुल बनसोड, गणेश वरकड, रणजित मुळे, नगरसेवक आनंद घोडेले, हर्षवर्धन तुपे, मिलिंद पाटील, पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे, उल्हास उढाण आदींची उपस्थिती होती. मिरवणूक राजाबाजार, शहागंज, सिटीचौक, मच्छलीखडक, गुलमंडी, पैठण गेट मार्गे क्रांती चौकापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीसाठी समिती अध्यक्ष विनायक गुंजाळ, संदीप शेळके, संभाजी बनकर, आत्माराम शिंदे, शैलेश शिंदे, किशोर विटेकर, मनोज पाटील, शशांक सोळंके, विश्‍वजित चव्हाण, धनंजय मिसाळ, तुषार पाटील, शैलेस भिसे, मयूर डोणगावकर आदींनी सहकार्य केले; तसेच संभाजी ब्रिगेड, अंगुरीबाग युवा मंच, अखिल भारतीय छावा संघटना आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुस्लिम बांधवांकडून सिटीचौकात स्वागत
राजाबाजार येथून निघालेली मुख्य मिरवणूक सिटीचौक येथे आल्यावर मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले. शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पहाराने स्वागत केले; तसेच गुलालाऐवजी फुलांची उधळणही केली.

पोलिसांच्या आवाहनाला सहकार्य
शिवजयंती मिरवणुकीत गुलालामुळे प्रदूषण, मिरवणुकीतील सहभागी, परिसरातील नागरिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्यामुळे गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करण्यात यावी, असे आवाहन विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले होते. महोत्सव समितीने त्याचे पालन करून गुलालाऐवजी फुलांची उधळण करत पोलिसांनाही सहकार्य केले.

औरंगाबाद शहरात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी



औरंगाबाद, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
औरंगाबाद शहरात शनिवारी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध पक्ष आणि संघटनांतर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शनिवारी सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री उशिरा या मिरवणुकीचा समारोप झाला.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक संस्थांनी सजीव देखावे साकारले होते. लेझिम, टाळ मृदंग यामुळे शहांगज, सराफा, मच्छली खडक, गुलमंडी हा मार्ग दणाणून गेला होता. या मिरवणुकीचा समारोप क्रांतिचौकात करण्यात आला. या मिरवणुकीत आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजय वाघचौरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे, पोलीस आयुक्त श्रीकांत सावरकर, शिवजयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विनायक गुंजाळ, हर्षवर्धन तुपे पाटील, रंगनाथ काळे, प्रकाश मुगदिया, सुभाष झांबड, अभिजीत देशमुख, संदीप शेळके, मनमोहनसिंग ओबेरॉय, जी.एस.ए. अन्सारी, तनसुख झांबड आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांदे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त नामदेव जोगदंड यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विद्यापीठात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रवेशद्वारापासून ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली.

No comments: