Monday, February 21, 2011

यवतमाळ शिवजयंती २०११


शिवजयंती उत्सव आर्णीत थाटात साजरी




आर्णी, २० फेब्रुवारी / वार्ताहर
येथे शिवजयंती उत्सव सोहोळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिवनेरी चौक व शिवाजी चौकातील शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित सोहोळ्यात असंख्य शिवप्रेमींनी मोठय़ा संख्येनी हजेरी लावली होती. गांधीनगरातील प्राथमिक मराठी शाळेत आयोजित सोहोळ्यात माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे संचालक ख्वाजाबेग, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तिन्ही वक्तयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्अध्यक्षस्थानी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. गिरीधर कुबडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बबन मुडवाईक यांनी केले. कार्यक्रमाला पंचायत समितीने उपसभापती विठ्ठल देशमुख, हरीश कुडे, सरपंच श्रावण मडावी, उपसरपंच शे. मोहीब, माजी उपसरपंच छोटू देशमुख, माजी सरपंच अरुण राऊत, खुशाल ठाकरे आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमासाठी गिरीधर कुबडे, सुदर्शन चव्हाण, लक्ष्मण हिरवे, गजानन जगताप, पुरुषोत्तम झापे, दिलीप वानखडे, विश्वंभर उपाध्ये आदींनी विशेष परिश्रम घेतले।

शिवाजी महाराज बुद्धिवान लढवय्ये होते - डॉ. आ.ह. साळुंके



दारव्हा, १७ फेब्रुवारी / वार्ताहर
शिवरायांचा प्रताप आठवत असताना ते अत्यंत बुद्धिमान लढवय्ये होते, याचे भान २१व्या शतकात जपणे अत्यावश्यक आहे, ही खरी शिवरायांप्रती निष्ठा असावी, असे कळकळीचे आवाहन डॉ. आ.ह. साळुंके यांनी ‘शिवरायांचे संस्कार आणि शिक्षण’ या विषयावर बोलताना केले.
येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त चार दिवसीय व्याख्यानमाला सोशल क्लबच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. साळुंके यांनी शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यात मॉ जिजाऊ व शहाजी यांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे, हे सोप्या शब्दात व्यक्त केले. संस्कार आणि शिक्षणातून ते अत्यंत बुद्धिमान लढवय्ये बनले. शिवराय बुद्धिमान लढवय्ये होते, याचा कधीही विसर पडू नये, अशी त्यांनी कळकळीची विनंती केली.
अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. दिनेश नरवडे यांनी आभार मानले. व्याख्यानास श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उद्या १८ फेब्रुवारीला प्रभाकर गावंडे यांचे व्याख्यान होणार असून १९ फेब्रुवारीला मिरवणुकीचे आयोजन केले आहे.

No comments: