Monday, February 21, 2011

परभणी शिवजयंती २०११

परभणी शिवजयंतीचा उत्साह

परभणीत शिवभक्तांची जल्लोषी मिरवणूक



परभणी, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आज शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत जिल्हाभरातून वारकरी मंडळी सहभागी झाली होती. टाळमृदंगाच्या गजरात विठुरायाच्या जयघोषात ही मिरवणूक श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाली.
आज सकाळी श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अ. भा. वारकरी मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी यज्ञकुमार करेवार, ह. भ. प. धोंडीगिरी मिरखेलकर, लक्ष्मी काळदाते, ह. भ. प. मधुकरबुवा लोहगावकर, केशवराव नावकीकर, राधिका भालेराव आणि पोलीस कर्मचारी सय्यद अफसर सय्यद जफर यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर शिवजयंतीची मिरवणूक निघाली. यामध्ये मोठय़ा संख्येने वारकरी सहभागी झाले होते. भजनी मंडळे तल्लीन होऊन टाळमृदंगाच्या गजरात विठुरायाचा जयघोष करीत मार्गस्थ झाले. या वेळी डॉ. शालिग्राम वानखेडे आणि रघुनाथ खैरे यांनीही टाळ हाती घेऊन काही काळ सोबत केली. भजनी मंडळींमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. वयोवृद्ध वारकऱ्यांनी मृदंगाच्या ध्वनीवर ताल धरला. यानंतर महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली.
नगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण
परभणी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा जयश्री खोबे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, श्री. देशमुख, मुंढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
रायगड मित्रमंडळाची रॅली
रायगड मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवरायांचा जयघोष करीत ती शहराच्या विविध भागांतून नेण्यात आली. या वेळी सहभागी युवकांकडे भगवा ध्वज होता.

No comments: