Saturday, February 19, 2011

कोकण शिवजयंती २०११

रत्नागिरी शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)

शिवराज्याभिषेक देखावा आकर्षण
रत्नागिरी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय दहिवली- खरवते, राजाभाऊ रेडीज अध्यापक विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेली रथयात्रा आकर्षण ठरली.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव अशोक विचारे, प्रशांत निकम, प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील, प्राचार्य उमेश लकेश्री, प्रा. एम. आर. जम्मा, प्राचार्य तानाजी कांबळे, प्राचार्य रतन कांबळे यांनी शिवज्योतीचे स्वागत केले.
शरदचंद्र पवार कृषी, उद्यानविद्या, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व द. ग. तटकरे कृषीतंत्र विद्यालय दहिवली-खरवते महाविद्यालयाच्या 160 विद्यार्थ्यांनी विशाळगडावर जाऊन शिवज्योत आणली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने डेरवण शिवसृष्टी येथून शिवज्योत आणली. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाचा देखावा रथयात्रेद्वारे केला. ही रथयात्रा डेरवण शिवसृष्टीवरून संस्थेच्या प्रांगणात व तेथून बाजारपेठेतून आयटीआय कॉलेजमध्ये नेण्यात आली. राजाभाऊ रेडीज अध्यापक विद्यालयात "राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या' हे नाटक सादर केले. यावेळी प्रा. भारत सुळे, प्राचार्य कांबळे यांनी शिवचरित्रावर मनोगत व्यक्‍त केले. दहिवली-खरवते कृषी विभागानेही शिवजयंतीची मिरवणूक बाजारपेठेतून काढली. कृषी विभागाने शिवजयंतीनिमित्त महापूजेचे आयोजन केले होते।

'रयतेच्या राजा'ला मानाचा मुजरा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
मंडणगड - विश्‍वदिप नवतरुण मंडळ, शिरगाव व रयत फौंडेशनतर्फे शहरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातून सुरू झालेल्या शिवरथ यात्रेचा समारोप किल्ले मंडणगडवर जयघोष करत रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यात आला.
सकाळी साडेनउ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलसमोर शिव प्रतिमेच्या पूजनाने व ज्योत प्रज्वलित करून शिवरथ यात्रेची सुरवात करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन दलितमित्र पुरस्कारप्राप्त दादासाहेब मर्चडे व राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भाई पोस्टुरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांच्या हस्ते ज्योत पेटवून यात्रेला सुरवात करण्यात आली. मंडणगड किल्ल्याकडे प्रयाण केलेल्या यात्रेचे शहरातील ग्रामपंचायत व्यापारी संकुलाच्या इमारती शेजारी नागरिकांनी स्वागत केले.
आदेश केणे, महेश घोसाळकर, प्रकाश शिगवण, रमेश दळवी, आदिनाथ सांगले, राम देवरे, अजित कोकाटे, विजय लेंढे, बबन लेंडे, काशिनाथ बैकर, सलाम मुकादम, शकूर बुरोंडकर, आदेश मर्चडे, प्रमोद झगडे, सचिन थोरे, अनंत शिगण, रियाज खल्पे, बाळा बकरे, दत्तात्रेय लेंडे, विजय फोटफोडे, आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. या रथ यात्रेत मंडणगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, ए. बी. अध्यापक विद्यालयाचे छात्र सहभागी झाले होते.
किल्ल्यावर पोचल्यावर दाऊद खान बाबा यांच्या दर्ग्यावर मान्यवरांनी पुष्प व संदल अर्पण केले. यानंतर तोफेच्या बाजूला शिवजयंती साजरी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, दयानंद कांबळे, आदेश केणे, पोलिस निरीक्षक सी. बी. भालके, सुभाष तांबे, भरत यादव, राजेश गमरे यांनी मनोगत व्यक्त केले.

संगमेश्‍वर पंचायत समितीतर्फे शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
साडवली : संगमेश्‍वर पंचायत समितीतर्फे छत्रपती संभाजी सभागृहात सभापती नंददीप बोरूकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवजयंती पाहून निर्मल स्व-राज्य मोहीम महाराष्ट्रात सुरू करण्यात आली असून मुंबईसह 33 जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ पंचायत समिती सभागृहात करण्यात आला. यावेळी सभापती नंददीप बोरुकर, उपसभापती वंदना जायगडे, गटविकास अधिकारी चंचल पाटील, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सदस्य, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. संगमेश्‍वर तालुक्‍यात 128 ग्रामपंचायतीपैकी 98 ग्रामपंचायती निर्मल म्हणून घोषित करण्यात आल्या असून उर्वरित 17 ग्रामपंचायती स्वराज्य निर्मल योजना मोहिमेतून संगमेश्‍वर तालुका शंभर टक्‍के निर्मल करण्याची घोषणा या समारंभात करण्यात आली.
स्वच्छता अभियान महाराष्ट्रात राबवले जाणार असून या मोहिमेची सांगता 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी होणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत निर्मल ग्राम योजनेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट-गाईड, एनसीसी, नेहरू युवा केंद्रे, कीर्तनकार, पत्रकार संघ यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायती 100 टक्‍के हागणदारीमुक्‍त होतील त्यांचा 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी गौरव करण्यात येणार आहे.

शिवजयंतीनिमित्त आजपासून पुस्तक प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
चिपळूण : येथील आंबेडकर वाचनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येथील आंबेडकर वाचनालयात हा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी महाराज व शिवकालीन मराठेशाहीतील कर्तबगार सरदारांच्या पराक्रमावर प्रकाश टाकणारे ऐतिकासिक साहित्य व ज्या किल्ल्यांवर शिवकालीन इतिहास घडला अशा किल्ल्यांची तोंड ओळख व ऐतिहासिक संदर्भ साहित्यांचे पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

चिपळूण मराठा संघातर्फे शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
चिपळूण - शिवाजी महाराजांचे गुण आपल्या अंगी बाणले पाहिजेत. त्याप्रमाणे आपले वर्तन सुधारले पाहिजे, असे मत चिपळूण तालुका मराठा संघाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी केले.
येथील चिपळूण तालुका मराठा संघातर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या बहादूरशेख नाका येथील सहकार सभागृहात शिवजंयतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला. यानंतर "अशीच आमुची आई असती सुंदर-रूपवती, तरी आम्हीही झालो असतो सुंदर वदले छत्रपती' हे गीत चिपळूण सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांनी सादर केले.
यावेळी श्रीधर जाधव व लहान मुलांनी शिवाजी महारांजाची माहिती सांगितली. कार्यक्रमाला अद्वैत रमण डांगे याने बाल शिवाजीचा वेश करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, महेश खेतले, मनोज पवार, दिवाकर देसाई, सखाराम पवार, शशिकांत कदम, रमण डांगे, सत्यवान म्हामूणकर, राजेश वाजे, चिपळूण तालुका मराठा संघ व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थचे सर्व सदस्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments: