Sunday, February 20, 2011

अकोला शिवजयंती २०११

शिवप्रेमीनी केली शिवजयंती साजरी



अकोला, २० फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८२ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा मंडळाच्या वतीने स्थानिक शिवाजी पार्क येथे शिव जन्मोत्सव व पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७ वाजता नगरसेविका प्रभावती जाधव व रोहिणी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मराठा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यां सविता कदम, दुर्गा पवार, कुसुम कावळे, संध्या काकडे, माधुरी बिडवे, मीना सराफ यांच्या द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी प्रतिमा पाळण्यात ठेवून परंपरेनुसार पाळणा म्हणण्यात आला.
पेढे व प्रसाद वाटप करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता महापौर सुरेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आमदार गोवर्धन शर्मा, भाजपा महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष रमेश तायडे, मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बिडवे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे प्रा. प्रदीप वाघ, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, यावेळी सामाजिक कार्यकर्ता महादेव भुईभार, मनोहर हरणे, विनायक पवार, राजाभाऊ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले।
अकोल्यात अवतरली शिवशाही...



मराठमोळ्या पोषाखात महिलांची स्कुटर मिरवणूक



अकोल्यात शनिवारी शिवजयंतीची भव्य शोभायात्रा
अकोला, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम शनिवारी येथे घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ व संयोजक पंकज जायले यांनी दिली.
शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती यावेळी वाघ यांनी दिली. शहरातील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन सकाळी ९.३० वाजता करण्यात येईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता येथील तोष्णीवाल लेआऊट येथील प्रभात किड्स येथून मराठमोळ्या पोषाखात महिलांची स्कुटर रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात येईल व तेथेच या रॅलीचे समापन होईल तर, सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी ५१ मोठय़ा नगाऱ्यांचा समूह असलेले पथक बोलवण्यात आले आहे. ते भव्य मिरवणुकीत महत्वाची भूमिका बजावतील. त्याचबरोबर राजंदा येथील दिंडी देखील या मिरवणुकीत सहभागी होणार आहे तर, शहरातील दोन व्यायामशाळांचे विद्यार्थी चित्तथरारक कसब दाखवणार आहे. शिवकालीन परंपरा असलेल्या गोंधळी नृत्य या मिरवणुकीत असेल तर, जाणता राजा या महानाटय़ातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे विवेक कोल्हे शोभायात्रेत शिवरायांच्या वेशात त्यांच्या मावळ्यासह सहभागी होणार आहे.
पुणे येथील प्रसिध्द एअर फायर शो चे आयोजन या भव्य मिरवणुकीच्या समापनाच्या वेळी स्थानिक स्वराज्य भवनात रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. एअर फायर शो रात्रीचे विशेष आकर्षण राहणार आहे. यंदा पहिल्यांदा अकोल्यात अशा प्रकारे एअर फायर शो होणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली. सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे कार्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत करण्यात येणार आहे. शहरातील तरुणांनी व ज्येष्ठ नागरिकांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मृतीला सामूहिक उजाळा देण्यासाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला उत्सव समितीचे उपाध्यक्ष अनिल बिडवे, मनोहर हरणे, विनायक पवार, प्रा.मधु जाधव, मुरलीधर झटाले हे उपस्थित होते.

2 comments:

Prashant Vishe said...

तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.

Dr.Kadam said...

dhanywaad...