Monday, February 21, 2011

हिंगोली शिवजयंती २०११

हिंगोलीत विविध कार्यक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी



हिंगोली, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
शहरात विविध कार्यक्रमांतून शिवजयंती साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ व इतर संस्थांनी एकत्रपणे विविध स्पर्धाचे तसेच २३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गांधी चौकात शनिवारी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडय़ाचा कार्यक्रम घेण्यात आला.
महात्मा गांधी चौकात शनिवारी मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक केशव पाटील यांनी शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली त्यांनी इतरांच्या धर्माचा आदर राखल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून हिंगोलीत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पालिकेतून एकमताने जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून रामकृष्णा लॉजसमोर जागा दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले.
शनिवारी दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा व कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. रविवारी जागतिक सामाजिक दिवस, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ला रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील निरंजन चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, जिल्हा गणित अध्यापक मंडळ, सत्यनारायण विद्यामंदिर, आदर्श महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत औंढा नागनाथ,कलमनुरी,वसमत, सिरसम (बु।), केंद्रा (बु।), पुसेगाव आदी ठिकाणी शिवजयंती विविध कार्यक्रमांतून साजरी करण्यात आली.

No comments: