Friday, February 19, 2010

राज्यभर शिवजयंती उत्साहात

आज शिवजयंती...त्यानिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शिवनेरी गडावर जाऊन शिवप्रतिमेचे पूजन केले. तर जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी शासकीय पूजा केली.


दरम्यान पुण्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडावर आज 500 सुरक्षा कर्माचारी तैनात आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मराठा महासंघाच्या मागणीशी आपण सहमत आहोत, असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले.


नागपूरमध्ये उत्साह


नागपूरमध्येही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नागपूरच्या गांधी गेट येथील शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. याच निमित्ताने लहान मुलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सगळे विद्यार्थी मावळ्यांच्या वेशात आले होते. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.


सोलापुरात सांस्कृतिक कार्यक्रम


सोलापूरमध्येही शिवजयंती जोरदार साजरी करण्यात आली. यावेळी सोलापुरमधील मान्यवर मंडळी उपस्थित होती. शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


सांगलीत मुस्लिम समाजाचा सहभाग


सांगलीत आज मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुस्लिम समाजाच्या वतीने हार घालण्यात आला.

शिवाजी महाराजांच्या सय्यद बंडा, हिरोजी फर्जद अशा मुस्लिम शिलेदारांची यावेळी माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाला महिला आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती.

No comments: