Sunday, February 21, 2010

आकर्षक मिरवणूक काढून शिवजयंती साजरी

ढोलताशांचा निनाद, लेझीम पथक, पोवाडे पथक, चित्ररथ व त्यावरील जिवंत देखावे यासह काढण्यात आलेल्या मिरवणुकीने नगर शहरात तारखेनुसार शिवजयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 4 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय शहरातील विविध चौकांतही छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे लावून शिवजयंती साजरी करण्यात आली. जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आज सकाळी सव्वा आठ वाजता जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी पुष्पहार अर्पण केल्यावर मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी पोलिस अधीक्षक विजय चव्हाण, महापालिका आयु्नत संजय काकडे, अप्पर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ज्योती सिंह यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विलासराव आठरे, उपाध्यक्ष रामनाथ वाघ आदी उपस्थित होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रेसिडेन्शिअल विद्यालय, अध्यापक विद्यालय, शिशू संगोपन विद्यालय यांच्यासह संभाजी ब्रिगेडही सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रथासह अन्य आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. या मिरवणुकीत गोडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा देखावेही सादर करण्यात आले होते. ही मिरवणूक शिवाजी महाराज पुतळ्यापासून माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट मार्गे नेताजी सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. नंतर तेथून चौपटी कारंजामार्गे रेसिडेन्शिअल महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली. येथे आकर्षक सजावट करून शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे ध्वनिवर्धकावर लावण्यात आले होते. भिस्तबाग नाका येथेही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक गणेश भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथेही आकर्षक सजावट करण्यात आली होती. केडगाव येथेही स्पंदन प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर संदीप कोतकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

No comments: