Sunday, February 21, 2010

विविध उपक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे, १९ फेब्रुवारी/प्रतिनिधी
ढोलताशांचा गजर करीत, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत काढण्यात आलेल्या मिरवणुका; विद्यार्थी, अनाथ मुलांना मिठाई वाटप; अभिवादन सभा या उपक्रमांद्वारे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून प्रत्यक्षात ते साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना विविध संस्था, संघटनांनी मानाचा मुजरा करीत जयंती उत्साहात साजरी केली.
शिवजयंतीनिमित्ताने शहरात विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या. भवानी माता मंदिरापासून मोठी मिरवणूक काढण्यात आली. भगवे झेंडे, घोडे, पेहराव परिधान केलेली मुले हे सर्वच मिरवणुकांचे आकर्षण ठरले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळात सभापती अंकुश काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी नानासाहेब बोठे अध्यक्षस्थानी होते. उपअभियंता दिलीप रामतीर्थ, नंदकुमार क्षीरसागर, मिळकत व्यवस्थापक एस. जी. घोडे, ज्ञानेश्वर डवरी, दिनेश रेडकर, डी. जी. गायकवाड आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या शहर शाखेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या. अ‍ॅड. औदुंबर खुने पाटील, कासमभाई शेख, नारायण साठे, मुश्ताक पटेल, शालिनी जगताप, किरण पोकळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले. या वेळी नाझनीन सय्यद, प्रा. अविनाश ताकवले, लुकमान खान आदी उपस्थित होते.
कोंढव्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने वर्धमान जैन यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. संस्थेचे अध्यक्ष रशीद हसन खान, संचालिका नजीमा खान उपस्थित होते. वानवडी गाव ट्रस्ट आणि विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वानवडी येथे शिवजयंतीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी हनुमंतराव गवळी उपस्थित होते. वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्ही. टी. पवार, नगरसेवक अभिजित शिवरकर, जनसेवा बँकेचे नाना कचरे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, श्रीरंग आहेर आदी उपस्थित होते.
पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. अफताब अनवर शेख, डॉ. अरुणकुमार वाळुंज, डॉ. नजरूल बारी, डॉ. शाकीर शेख यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र कॉस्मोपोलेटिन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने २९ शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आझम कॅम्पस ते लाल महालपर्यंत मिरवणूक काढली. मिरवणुकीचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी केला. सचिव लतीफ मगदूम, प्रा. मुझफर शेख, इकबाल मुलानी, मुमताज सय्यद यांची उपस्थिती होती.
शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने शिवजयंती निमित्ताने शहरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्यात दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सरदार कान्होजी जेधे यांनी वतनावर पाणी सोडल्याचा देखावा सादर करण्यात आला. समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण क रण्यात आला. ध्येयवादी शिवाजी महाराजांचे विचार अनुकरणीय आहेत. महाराजांवर अनेक संकटे आली, तरी त्यांनी ध्येयवाद सोडला नाही. कोणत्याही निराशेने खचून न जाता ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी महाराजांचे अनुकरण करावे, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. सोसायटीचे मानद सचिव सर्जेराव जेधे यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार वसंत थोरात, सुरेश खैरे, आबासाहेब शिंदे, राजेंद्र जगताप, जगदीश जेधे, संभाजी कापसे, राजाराम जेधे, धनाजी जेधे, बाळासाहेब जगताप, विकास गोगावले, नगरसेवक अशोक ऐनपुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य म. ना. कांबळे यांनी केले. सिंहगडावरून शिवज्योत घेऊन आलेल्या शंभर कार्यकर्त्यांचे नगरसेवक रामचंद्र कदम यांनी स्वागत केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साधू ठोंबरे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, महात्मा फुले कामगार संघटना, तोलणार संघटना, टेम्पो पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत या संघटनांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भवानी पेठेतील हमाल चौक ते लाल महालापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. कष्टकरी महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सनई, चौघडा, नगारखाना, अश्वारूढ मावळे, बॅन्ड पथक आदींचा मिरवणुकीत समावेश होता. मिरवणुकीनंतर डॉ. बाबा आढाव यांनी मार्गदर्शन केले. गणेश घुले, सुरेश शेवाळे, राजेंद्र चोरघे आदींची उपस्थिती होती. पुणे विद्यापीठात शिवजयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. पंडित विद्यासागर, जयकर ग्रंथालयाचे डॉ. एस. के. पाटील, डॉ. धनजंय लोखंडे, प्रा. तेज निवळीकर उपस्थित होते. मराठा महासभेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संगणक अभियंता देवेंद्र लाटे यांच्या हस्ते क रण्यात आले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, महापौर मोहनसिंग राजपाल, संस्थेचे सचिव शिवाजी महाडकर, उत्तमराव पाटील उपस्थित होते.
राष्ट्रीय दलित पॅंथर, कॅन्टोन्मेंट बोर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, स्वाभिमान संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस, लोकमान्य टिळक प्रस्थापित गणपती ट्रस्टसह विविध संस्था, संघटनांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
कोथरूड ब्लॉक कॉँग्रेसच्या वतीने आज कोथरूडमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक दामोदर कुंबरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संदीप कुदळे, हनुमंत राऊत, बबनराव भिलारे, किशोर मारणे, राजेंद्र मगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते आशिष गार्डन या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

सांगलीत मुस्लिम बांधवांकडून ठिकठिकाणी शिवजयंती



लोकसत्ता वृत्तान्त
सांगली, १९ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
सांगली शहर परिसरात आज शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या शिवजयंती उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा ठेवून विधिवत शिवजयंती साजरी केली.
मिरज येथे गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी झालेला वाद व त्यानंतर मिरज, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर येथे उसळलेल्या दंगलींचे कोणतेही सावट आजच्या शिवजयंती उत्सवावर दिसत नव्हते. या दंगलीमुळे दुभंगली गेलेली हिंदू-मुस्लिम समाजाची मने सांधण्याचा प्रयत्न आजच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने केला गेला. शहरातील मुस्लिम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन शहरात ठिकठिकाणी मांडव घालून शिवाजीमहाराजांचे विविध आकारांतील पुतळे, प्रतिमा ठेवल्या होत्या, त्यांना काही ठिकाणी आरासही केली होती. या ठिकाणी स्टिरिओवर लावलेल्या शिवभक्तिपर पोवाडय़ांनी व गीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते. शहरभर भगवे झेंडे फडकत होते. बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यात असणाऱ्या अनेक मुस्लिम सरदार व शिपायांची नावे असलेला फलक समस्त शिवप्रेमी मुस्लिम समाजातर्फे लावण्यात आला होता.
शहरातील विविध तरुण मंडळांनी वेगवेगळय़ा गडांवरून आणलेल्या शिवज्योती आज सकाळीच शहरात दाखल झाल्या होत्या.
या ज्योतींचे व शिवप्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांच्या निनादात सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ाला सकाळी अभिषेक करण्यात आला.


प्रेरणादायी शिवजन्मसोहळा
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

' जय भवानी, जय शिवाजी ' किंवा ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या घोषणा ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच ! छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व जाती-धर्माच्या ' मावळ्यांना ' बरोबर घेऊन गाजवलेला पराक्रम आजही प्रेरणादायी आहे.

शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ. १९ फेब्रुवारी, १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या बाल शिवबानं पुढं हिंदवी स्वराज्य स्थापन करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण राहावी, नव्या पिढीला त्यापासून स्फुर्ती मिळावी यासाठी दर वर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा साजरा होत असतो. शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवीचं आणि शिवजन्मस्थळाचं दर्शन घेणं ही एक आनंददायी घटनाच असते !

महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा प्रदेश ! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या किल्ल्यांना भेटी देणं आणि इतिहासात रमणं हा माझा आवता छंद ! शासकीय सेवेत आल्यानंतर हा छंद वाढवता आला नाही. तथापि सन २००६ पासून शिवजयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा करण्याची संधी मी सोडलेली नाही. तसं म्हटलं तर शिवनेरी किल्ला व परिसर विकास बैठकीच्या निमित्तानं या किल्ल्याला भेट देण्याचा योग येतो.

शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी अभिवादन करण्यास येतात. यंदाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे येणार असल्यानं वृत्तांकन आणि चित्रीकरणासाठी जाणं आवश्यक होतं.

पुण्यापासून शिवनेरीचं अंतर साधारण ८० कि.मी. आहे. शिवजन्मसोहळा सकाळी ९ च्या सुमारास होतो. पायथ्यापासून शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळापर्यंत जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही, त्यामुळं पायी चालण्याशिवाय पर्याय नसतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पुण्याहून आदल्या रात्री म्हणजे १८ फेब्रुवारीसच निघालो. रात्री मंचर जवळ मुक्काम करुन सकाळी ६ च्या सुमारास शिवनेरीकडे प्रयाण केले. शिवनेरी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत शासकीय वाहनानं गेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास पायी करावा लागणार होता, त्यामुळं मी, मुख्य कॅमेरामन जयसिंग जाधव, सहायक संजय गायकवाड, छायाचित्रकार सतीश कुलकर्णी, राहुल पाटील असा आमचा लवाजमा निघाला !

शिवाई देवी मंदिरातील देवीचं भजन, शिवरायांचा पोवाडा लाऊडस्पीकरमुळं संपूर्ण परिसरात ऐकू येत होता. पोवाड्यामुळं एक वेगळाच उत्साह जाणवत होता. वरपर्यंत तयार करण्यात आलेल्या पायर्‍यांवरुन आम्ही गडाकडं कूच केलं. महादरवाजा, गणेश दरवाजा, पिराचा दरवाजा, पालखी दरवाजा, हत्ती दरवाजा, मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा असे दरवाजे पार करत असताना आजूबाजूस लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडं लक्ष वेधून घेत होती. जुन्नर वन विभागानं या किल्ल्यावर जांभूळ, साग, काटेसावर, निलमोहर, कडूलिंब, गुलमोहर, करंज, पायर, बांबू, वड, चिंच, खैर, वरस, ग्लिरिसिडीया, पळस, चाफा, जास्वंद, बिट्टी अशी अनेक झाडं लावून परिसर शोभीवंत केलेला आहे. या झाडावरील वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजानं वातावरण आणखीनच भारावून गेलं होतं. प्रत्येक दरवाजावरील फुलांच्या माळा, सजावट किल्ल्याच्या सौंदर्यात भरच घालत होती.

ठराविक अंतरावरील सौरदिवे, कचरा कुंडी, पाने, फुले, फळे न तोडण्याचे आवाहन आणि त्यानुसार किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसत होता. किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणी कॅमेर्‍यानं तर कोणी मोबाईलवरुन फोटो काढून घेत होते.

सकाळी साधारण ७.३० च्या सुमारास आम्ही शिवाई देवी मंदिरात पोहोचलो. जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी अभिषेक आणि महापूजा केली. त्यानंतर शिवजन्मस्थळी आलो. त्या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. लाठी-काठी, ढाल, तलवार, फरशी, भाला, दांडपट्टा, खंजीर, बाणा, बनाटी आदी शस्त्रे ठेवण्यात आली होती.

सकाळी ८.३० वाजता शिवाई देवी मंदिर ते छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. ठीक सव्वा नऊ वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या हेलीपँडवर हेलिकॉप्टरनं आगमन झालं. शिवजन्मस्थळी पारंपरिक पध्दतीनं शिवजन्म सोहळयात सहभागी झाल्यानंतर पोलिसांच्या वतीनं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांनतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवकुंज इमारतीतील जिजाऊ आणि बालशिवबाच्या पुतळयास अभिवादन केले. उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शिवरायांनी त्यांच्या काळात रयतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. शिवरायांचा हाच आदर्श डोळयासमोर ठेवून महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे.

अभिवादनानंतर विजय माने यांच्या शिवकालीन शस्त्र कला पथकाच्या श्याम पाटील, राजाराम, प्रकाश या सहकार्‍यांनी दांडपट्टयाच्या सहाय्याने दुसर्‍याच्या डोक्यावरील नारळ फोडणे, जमिनीवर आडवा झोपलेल्या व हनुवटीखाली ठेवलेला बटाटा कापणे यासारखी श्वास रोखून धरायला लावणारी प्रात्यक्षिके सादर केली.

साधारण ११.३० च्या सुमारास मुख्य शिवजन्मसोहळा संपन्न झाला. आम्ही सर्वांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य प्रेमाची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवण्याची शपथ घेतली आणि गड उतरायला सुरूवात केली

No comments: