Sunday, February 21, 2010

विजयदुर्गावर आरमारी शिवस्मारक साकारणार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 21, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: konkan, malvan, shivaji maharaj
मालवण - "इतिहास जपण्याबरोबरच तो जगविता आला पाहिजे. त्यामुळे इतिहासाचा खोलवर व वस्तुनिष्ठ अभ्यास व्हायला हवा. यासाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यातील जलदुर्गापैकी विजयदुर्ग येथे आरमारी शिवस्मारक व बालोद्यान साकारण्यात येणार आहे,'' अशी माहिती कोल्हापूरचे श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.संभाजीराजे येथे शिवराजेश्‍वर मूर्तीला वस्त्रे प्रदान करण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ते म्हणाले, ""इतिहासावर संशोधनात्मक काम झाले पाहिजे. अनेक नवनवीन अंगाने इतिहासाचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. असे न झाल्यास आपल्याला राष्ट्रजीवन जगताना अंधारात चाचपडत जगल्याप्रमाणे वाटेल. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्या भागात असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक दुसरा कोणी येऊन करणार अशी समज न करता आपणच अशा वास्तूंच्या जपणुकीसाठी प्रयत्न केला पाहिजे. अशाच एका ध्येयाने प्रेरित झालेल्या छत्रपती शिवाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी विजयदुर्गवर शिवरायांचे आरमारी स्मारक व बालोद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ८० लाख रुपयांची आवश्‍यकता असून या कामाचा प्राथमिक आराखडा बनविल्यानंतर विजयदुर्गमधील स्थानिकांशी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी या गावातील शिवभक्‍त दानशूर विजय जांभेकर यांनी आपली ५००० चौरस फुटांची जागा या दिली आहे. त्यामुळे या स्मारकाच्या कामासाठी शिवप्रेमींमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.''ते म्हणाले, "या प्रकल्पामध्ये शिवरायांच्या आरमाराचे गलबत व गलबतावर महाराज, एक प्रधान व एक दर्यावर्दी नाविक असे पुतळे उभारून त्याभोवती बालोद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामधील पुतळे साकारण्यासाठी कोल्हापूर येथील शिल्पकार समीर सावंत व विक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी या कामाला सुरवातही केली आहे. या कामाचा आराखडा प्रसिद्ध आर्किटेक्‍चर सत्यजित पवार यांनी बनविला आहे. तरी या प्रकल्पासाठी राज्यातील शिवप्रेमींनी, देणगीदारांनी, विविध संस्थांनी मदत करावी. त्यांनी आपली मदत छत्रपती बिग्रेड घर नं. १०४७, ए वॉर्ड, फिरंगाई मंदिरानजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर, तसेच अतुल माने, गिरीश जाधव यांच्याशी संपर्क साधावा.''

No comments: