Wednesday, December 30, 2009

शिवजयंती

जिल्ह्य़ात शिवजयंती उत्साहात
नगर, १९ फेब्रुवारी

जिल्ह्य़ात सर्वत्र आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. हाती भगवे ध्वज, ‘जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष, शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या छत्रपती शिवरायांच्या व मावळ्यांच्या वेशभूषा, लेझीम पथक मिरवणुकांचे आकर्षण ठरले.
पारनेरला शिवजयंती साजरी
पारनेर - उच्चवर्णीय इतिहासकारांनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा खरा इतिहास बहुजन समाजापुढे येऊ दिला नाही, असा आरोप शिवचरित्राचे अभ्यास प्रा. दि. वा. बागूल यांनी केला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व दोस्ती ग्रुपच्या वतीने आयोजिलेल्या शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी औटी अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार गणेश मरकड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम मते, डॉ. आर. जी. सय्यद, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, शंकर नगरे, शाहूराव औटी, कांतिलाल कोकाटे, जयप्रकाश साठे, दिलीप भालेकर, सरपंच राजेंद्र तारडे, उपसरपंच विजय डोळ, दीपक नाईक, दादा शेटे, सलीम राजे यावेळी उपस्थित होते. शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तहसीलदार मरकड व श्री. औटी यांची भाषणे झाली. कार्यक्रमानंतर शिवपुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.
सर्व गडांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा - विखे
श्रीगोंदे - छत्रपती शिवाजीमहाराजांनी मोगलांच्या ताब्यातून मोठय़ा कर्तृत्वाने जिंकलेल्या राज्यातील गडांची अवस्था वाईट असून, सरकारने या सगळ्या गडांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा, अशी मागणी जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केली.
येथील राजे छत्रपती शिवाजी मराठा सेवा प्रसारक मंडळाने आयोजिलेल्या शिवजयंती सोहळ्यात त्या बोलत होत्या. मंडळाच्या वतीने त्यांना ‘आदर्श राजमाता’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना नेते भाऊसाहेब गोरे होते. यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्य अनिल ठवाळ, ज्येष्ठ नेते सुभाष डांगे, अनुराधा नागवडे, मंदाकिनी शेलार, संभाजी बोरुडे, बाळासाहेब नलगे, मल्हारराव घोडके, संतोष रोडे आदी उपस्थित होते. विखे म्हणाल्या की, छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, महात्मा फुले या थोर पुरुषांना समाज विसरत चालला आहे. केवळ अभ्यासक्रमात या महापुरुषांना आठवून उपयोग नाही. त्यांच्या कर्तृत्वाचे अनुकरण समाजात होणे गरजेचे आहे. मंडळाचे अध्यक्ष राजकुमार गोरे यांनी प्रास्ताविक केले. आज सकाळी मराठा सेवा संघाने अध्यक्ष सुनील जाधव व मिलिंद पोटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातून मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
लक्षवेधी मिरवणूक
राहाता - प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्थापन केलेल्या शिवछत्रपती विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत शिवाजीमहाराजांची आणि मावळ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. सुजय विखे, प्राचार्य डॉ. धीरेंद्र, प्राचार्य डॉ. बंगाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे डायरेक्टर जनरल मैंदारकर यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. प्रा. सरोदे यांचे भाषण झाले.
शिवपुतळ्याचे पूजन
नेवासे - शहरात शिवजयंती उत्सव शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने मोठय़ा उत्साहात साजरा झाला. प्रारंभी खोलेश्वर गणपतीचे, नंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन सुनील गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कारभारी वाखुरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके, सरपंच नंदकुमार पाटील, स्वातंत्र्यसैनिक किसनराव जपे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदुभाऊ जोशी, मार्केट कमिटी सदस्य बापूसाहेब गायके यांनी शिवरायांना अभिवादन केले.
विविध कार्यक्रम
नगर - जेऊर, चिचोंडी पाटील, मेहेकरी, कामरगाव, हिंगणगाव, देहरे, वाळकी, रूईछत्तीशी येथे शिवप्रतिमेला पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली. वाळकी येथे महेंद्रनाथजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, सेनेचे तालुकाप्रमुख संजय कार्ले, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र दळवी, सरपंच जगन्नाथ आढाव आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बोठे यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.
शिवप्रतिमेची मिरवणूक
कर्जत - येथील राजमुद्रा ग्रूपच्या वतीने आज शिवजयंती जोशात साजरी करण्यात आली. येथील मराठी मुलांच्या शाळेमध्ये शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती मीनाक्षीताई साळुंके होत्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, नामदेव राऊत, शिवरत्न पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, स्वप्नील देसाई व राजमुद्रा ग्रूपचे दिलीप तोरडमल आदी उपस्थित होते. सायंकाळी शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

No comments: